• दोनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा कायम
  • गोविंदाच्या जयघोषात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त बेळगाव शहर आणि शहापूर येथील श्री वेंकट रमण देवस्थानांचा पारंपरिक रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. दोनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्री वेंकट रमणाचे दर्शन घेतले. ‘वेंकट रमण गोविंदा, गोविंदा’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडे घालून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी रथ ओढत शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली. रथावर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती, तर विविध ठिकाणी सुहासिनींनी आरती करून देवाचे स्वागत केले. महिलांच्या टिपरी पथकानेही रथोत्सवात सहभाग घेत उत्सवाची शोभा वाढवली.

रथोत्सवाच्या मार्गावर भाविकांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर रथ पुन्हा मंदिरात दाखल झाला आणि पारंपरिक रथोत्सवाची सांगता झाली. विजयादशमीच्या निमित्ताने जपली जाणारी ही ऐतिहासिक परंपरा बेळगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारी ठरली.