• दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ
  • दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले

बेळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमाननगर येथे घडली. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या सणादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दोन मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगावाड येथील अश्विनी हेगडे आणि बैलहोंगळ तालुक्यातील विठ्ठल हेगडे यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर उदरनिर्वाहासाठी हे दाम्पत्य बेळगाव शहरात स्थायिक झाले. त्यांना दोन मुले असून, संसार सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. विठ्ठल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमधील वाद वाढत चालले होते.

दसरा सणानिमित्त अश्विनी माहेरी गेल्या होत्या. आजारी असलेल्या सासऱ्यांना जेवण देण्यासाठी त्या घरी आल्या असताना ही घटना घडली. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या विठ्ठलने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान हिंसक घटनेत झाले. विठ्ठलने अश्विनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पत्नीच्या हत्येच्या आरोपावरून विठ्ठल हेगडे याला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सुमारे दहा वर्षांचा संसार अशा प्रकारे संपुष्टात आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने त्यांच्या संगोपनाचा आणि भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सणाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे हनुमाननगर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.