- सरकारी उर्दू शाळांमधील तीन दिवसीय आरोग्य शिबिराला प्रतिसाद
बेळगाव : विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत लहान वयातच रक्तक्षयाचे निदान व्हावे आणि त्यावर वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि हॅपी हार्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सरकारी उर्दू माध्यम शाळांमधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील एकूण १,०१९ विद्यार्थिनींची यावेळी रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान रक्तक्षय आढळलेल्या विद्यार्थिनींना मोफत उपचारांसह आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. लोहाच्या कमतरतेमुळे आणि अपुऱ्या पोषणामुळे मुलींमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे वेळीच निदान करून त्यावर उपचार करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. तसेच पोषणाचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी सांगितले की, समाजाचे आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि बालकांचे कल्याण यासाठी क्लब सातत्याने कार्यरत आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून गरजू व वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः ज्या विद्यार्थिनींना वैद्यकीय सुविधांची अधिक गरज आहे, त्यांना वेळेत उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







