- स्वतंत्र कारवायांमध्ये तिघांना अटक
बेळगाव : शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, घातक शस्त्र बाळगणे आणि मटका जुगार चालविण्याविरोधात केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये धारदार सुरी, ३,५९० रुपये रोख रक्कम आणि मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. २४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी-स्टॅबिंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करत मयूर सुभाष राऊत (वय ३२, रा. महाद्वार रोड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या धारदार सुरी आढळून आली. संभाव्य गुन्हेगारी कृत्याच्या उद्देशाने तो सुरी घेऊन फिरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडून सुरी जप्त करण्यात आली असून, मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६०/२०२६ नोंदवण्यात आला आहे. शस्त्र कायदा १९५९ मधील कलम २७(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ९७ अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, रविवार पेठेतील सिद्धेश्वर ॲग्रो सेंटरजवळ छापा टाकून पोलिसांनी पंकज मोहन जाधव (वय ३४, रा. कामत गल्ली) याला अटक केली. तो नागरिकांकडून पैसे गोळा करून आकड्यांवर आधारित मटका जुगार चालवत असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून १,२५० रुपये रोख आणि जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २५९/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच मोहिमेअंतर्गत कोतवाल गल्लीतील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकून मुदस्सर मेहबूब देसाई (वय ३४, रा. खंजर गल्ली) याला मटका जुगारात गुंतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडून २,३४० रुपये रोख रक्कम आणि जुगाराच्या चिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २६१/२०२६ नोंदवून कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) नुसार तपास सुरू आहे.
या तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईत सहभागी पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे.







