- ‘सकल मराठा समाज कर्नाटक’चा पुढाकार
- १५० ज्येष्ठ कर्तृत्ववान व्यक्तींसह पाच ज्येष्ठ पत्रकारांचा होणार गौरव
बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला एका व्यासपीठावर एकत्र आणून संघटनात्मक बळकटी देण्यासह समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ‘सकल मराठा समाज कर्नाटक’तर्फे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत राज्यभरातील मराठा बांधवांची डिजिटल नोंदणी केली जाणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा गौरवही करण्यात येणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत किरण जाधव यांनी अभियानाची माहिती दिली. समाजातील ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांची सांगड घालून सक्षम व संघटित समाजाची उभारणी करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व मराठा बांधवांना एकाच व्यासपीठावर जोडण्यासाठी ‘सकल मराठा समाज नोंदणी ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील व्यक्तींची डिजिटल नोंदणी करून परस्पर संपर्क आणि संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून यंदापासून ‘वीरमाता जिजाऊ पुरस्कार’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे १५० ज्येष्ठ कर्तृत्ववान व्यक्तींचा, तसेच पाच ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. पूज्य स्वामीजी आणि समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, फेब्रुवारी २०२७ च्या दुसऱ्या आठवड्यात भव्य पुरस्कार वितरण व नागरिक सन्मान सोहळा आयोजित करण्याचे प्राथमिक नियोजन आहे.
समाजातील गुणवंतांचा गौरव करण्याबरोबरच तरुणांना रोजगार व करिअरविषयक मार्गदर्शन, महिलांचे सक्षमीकरण आणि गरजू व्यक्तींना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे हे अभियान केवळ पुरस्कार वितरणापुरते मर्यादित न राहता समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
समाजाच्या एकजुटीसाठी सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून या संघटनात्मक अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. यावेळी माधुरी जाधव, सतीश बाचिकर, निवृत्त कॅप्टन डॉ. चांगप्पा पाटील, शशिकांत रणदिवे, राजन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








