• जिजामाता सर्कलजवळील नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू
  • स्मार्ट सिटी व महापालिकेला सहकार्याचे आवाहन

बेळगाव : मान्सूनपूर्व काळात शहरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने नालेसफाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. फोर्ट रोडवरील जिजामाता सर्कलजवळील नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असून, हे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेने तातडीने सहकार्य करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी केले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आज सकाळी ६ वाजल्यापासून जिजामाता सर्कल परिसरात नालेसफाई मोहीम सुरू करण्यात आली. या कामासाठी स्वच्छता कर्मचारी, जेसीबी आणि डंपर वाहनांची मदत घेतली जात आहे. सीबीटी बसस्थानक परिसरातून वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे नाल्यात अडथळे निर्माण झाले असून पाण्याचा प्रवाह बाधित होत आहे.

मात्र, संबंधित नाला सुमारे सहा फूट खोल असून त्यावर काँक्रीटचा स्लॅब असल्याने प्रत्यक्ष साफसफाईसाठी केवळ तीन फूट जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे कचरा काढण्यास मोठ्या अडचणी येत असून लहान बादल्यांच्या सहाय्याने काम करावे लागत आहे. परिणामी साफसफाईची गती मंदावली आहे.

याबाबत बोलताना सीईओ सुदाम मंचलवार म्हणाले की, हा नाला स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असल्याने नाल्यावरील सुमारे १२ फूट काँक्रीट स्लॅब काढून टाकण्याची आवश्यकता आहे. तसेच महापालिकेने अतिरिक्त जेसीबी आणि डंपर उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण नाला अवघ्या १५ दिवसांत स्वच्छ करता येईल. अन्यथा आगामी पावसाळ्यात या भागातील व्यावसायिक परिसरात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वच्छता कामगारांना कोणत्याही परिस्थितीत नाल्यात उतरवू नये आणि सर्व काम यंत्रसामग्रीच्या सहाय्यानेच करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाई मोहीम यशस्वी करण्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेने तातडीने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.