- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजन
- मराठी भाषिकांना सहभागी होण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभागाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सीमाभागातील काळ्या दिनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहे. १९५६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बहुभाषिक मराठी प्रदेशाचा समावेश तत्कालीन म्हैसूर राज्यात केला. त्यानंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिकांकडून हा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
गेल्या सात दशकांपासून हा प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात असून त्यांचे संविधानिक हक्क डावलले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. या प्रकारांचा निषेध करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात पुणे परिसरातील समस्त मराठी भाषिकांनी सहभागी होऊन निदर्शने यशस्वी करावीत, असे आवाहन आयोजक विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, वैराळ सुळकर, सातेरी पाटील, गंगाराम वीर, मारुती पाटील आणि अर्जुन वीर यांनी केले आहे.







