सदलगा : पती-पत्नीतील किरकोळ वादानंतर एका विवाहित महिलेने दुधगंगा नदीत उडी घेतल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे घडली. नदीत उडी घेतल्यानंतर महिला बेपत्ता झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू आहे.
सदलगा येथील रहिवासी मंजुळा वांजिरे (वय २५) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. स्थानिक माहितीनुसार, जत्रेला जाण्याच्या कारणावरून मंजुळा आणि तिचा पती अनिल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मंजुळा घरातून बाहेर पडून सदलगा गावाबाहेरील दुधगंगा नदीत उडी घेतल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर नदीकाठी तिच्या चपला आणि कपडे आढळून आले. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा वेग आणि खोली लक्षात घेऊन नदीत व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत तिचा शोध लागलेला नव्हता. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.








