बेळगाव / प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी जीर्ण घरे कोसळत असून पाटील मळा येथील एक सुमारे ८५ वर्षे जुने दुमजली घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली.
रामचंद्र गांधी यांच्या मालकीचे हे घर १९४० मध्ये बांधण्यात आले होते. त्यामुळे काळानुसार या घराचे बांधकाम जीर्ण झाले होते. पाटील मळा येथील 303/32 सीटीएस क्रमांकाच्या या घराची दुमजली इमारत अलीकडच्या काळात धोकादायक बनली असल्यामुळे तेथे कोणी राहत नव्हते असे समजते. रिकामे पडून असलेले हे घर सध्याच्या पावसामुळे काल सायंकाळी पूर्णपणे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच आज शनिवारी बेळगावचे तलाठी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या घराचा पंचनामा केला. याप्रसंगी घरमालक रामचंद्र गांधी यांच्यासह अभियंता अक्षता अडगुणकर, बिल कलेक्टर निंगाप्पा जी. डी. आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.