बेळगाव : सुहास गुर्जर यांनी रिलाएबल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून बेळगांवचे नाव परदेशात उज्वल केले. पण याबाबतचा गर्व त्यांनी कधी केला नाही. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे, असे उद् गार कॉलेज रोड येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी काढले.
रिलाएबल इंजिनिअरिंगला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. याबद्दल सुहास गुर्जर यांचा विवेकानंद सोसायटीतर्फे शुक्रवारी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. नाडगौडा बोलत होते. सोसायटीच्या सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर प्रा. नाडगौडा व ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते सुहास गुर्जर यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुहास यांच्या पत्नी व सोसायटीच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या सौ. रजनी गुर्जर यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
प्रा. दत्ता नाडगौडा आपल्या भाषणात म्हणाले, पूर्वी जपानहून बेअरिंग्ज येत असत. पण सुहास यांनी स्वतःच्या कारखान्यात हे बेअरिंग बनविले. त्याची जपानच्या कंपनीने खात्री करून ते योग्य ठरविले. वाणिज्य शाखेचे पदवीधर असूनही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्योग क्षेत्रात त्यांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.
भाषणाच्या सुरुवातीला प्रा. नाडगौडा यांनी बासरीवर दोन गाणी सादर केली.ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी, नितीन कपिलेश्वरकर, किशोर काकडे यांची यावेळी गौरवपर भाषणे झाली. सुहास गुर्जर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपण जे यश मिळवले त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे, असे सांगितले. तसेच सोसायटीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. सौ. रजनी गुर्जर यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. सोसायटीच्या कर्मचारी अर्चना दरवंदर यांनी आभार मानले. कार्यक्रमास चेअरमन कुमार पाटील, संचालिका नीता कुलकर्णी, प्रशांत पाटील, अनंथ शेठ, सल्लागार श्रीकांत पाटील, राहुल अंगडी, कर्मचारी विलास पेडणेकर, स्नेहल कुलकर्णी, सोनम मगनाकर व हितचिंतक उपस्थित होते.