पंढरपूर / वार्ताहर

आषाढीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना, एक दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शुभम पावले (वय २७) असे त्या मृत भाविकाचे नाव आहे. सकाळी सातच्या सुमारास तो चंद्रभागा नदीत, पुंडलिक मंदिराजवळ आंघोळीसाठी गेला असता,पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.  या घटनेमुळे नदी काठावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने ४ तासाच्या शोध मोहिमेनंतर शुभम पावले याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. शुभम हा आपल्या चौघा मित्रांसह नदीत अंघोळीसाठी उतरला होता चौघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मात्र तिघांना वाचवण्यात आले अशी माहिती उपलब्ध झाली आहे.