बेळगाव : समाजात गरजूंना हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्याने आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी उपक्रमांतर्गत माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला.

शुभम कांबळे हे पंडित नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी असून द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शुभम यांनी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने राष्ट्रीय पातळीवर जलतरण स्पर्धांमध्ये नाव लौकिक केले आहे. मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळा येण्याची शक्यता होती.

ही गरज लक्षात घेऊन हिंदमाता विद्यालयाचे शिक्षक व विश्वभारत सेवासमिती संचालक स्व. कैलासवासी पुंडलिक कंग्राळकर यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या एफडीमधून मिळालेल्या व्याजातून शुभम याच्या शैक्षणिक फीससाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली. ही मदत माधुरी जाधव फाउंडेशनच्या संचालिका माधुरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कार्यक्रमाला विश्व भारत सेवा समितीचे सेक्रेटरी प्रकाश नंदीहळी व पंडित नेहरू विद्यालयाचे टॉप कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी माधुरी जाधव यांनी शुभमच्या कार्याची प्रशंसा करत “भविष्यात शुभमने शिक्षण क्षेत्रातही नावलौकिक करावा,” असे आवाहन केले. व त्या पुढे म्हणाले की, “शुभम कांबळे दिव्यांग असला तरी आम्ही त्याला कधीच दुर्बल समजले नाही, उलट आम्ही त्याला ‘भारताचा डायमंड – कोहिनूर’ असे गौरवनाम दिले आहे. त्याची ही यशस्वी कामगिरी सिद्ध करते की, तो कोणत्याही बाबतीत कुठेही कमी नाही. या गुणी विद्यार्थ्याचे मनापासून कौतुक वाटते,” असे मत माधुरी जाधव यांनी व्यक्त केले. शुभमसारख्या गुणवंत व जिद्दी विद्यार्थ्यांना मिळणारी ही मदत त्याच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.