बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या आधीन झाली. बऱ्याच जणांना अहल्याच्या हातून हे पाप अजाणतेपणी झाले असे वाटते, परंतु वाल्मिकी रामायणात मात्र अहल्येने जाणीवपूर्वक हे पाप केल्याचे दिसते. गौतमांच्या येण्याची वेळ झाली हे पाहून तिने इंद्राला तातडीने निघून जाण्याचे सांगितले. गौतमांनी इंद्राला पाहिले आणि त्याला शाप दिला. त्याचप्रमाणे अहल्येलाही तू शिलावत जड होऊन पडशील असा शाप दिला. त्याचबरोबर नित्य भगवंताचे स्मरण करत इथे राहशील आणि त्या काळात कोणीही हिंस्र श्वापद अथवा पक्षी येथे येऊन तुला त्रास देणार नाहीत. इतकेच नव्हे तर तुला तहानभूकही लागणार नाही असे सांगून आपल्या पत्नीची काळजीही घेतल्याचे दिसते. पुढे श्रीराम तिथे आल्यावर तुझी शापातून मुक्तता होईल आणि त्याच वेळेला तुला घ्यायला मी स्वतः येईन असे आश्वासन त्यांनी दिले. विश्वामित्रांसह राम-लक्ष्मण तिथे आल्यावर त्यांनी अहल्येला वाकून नमस्कार केला. पाय लावला नाही. त्याचवेळी गौतम स्वतः तिला नेण्यासाठी आले. अहल्या ही स्वतः ऋषीपत्नी होती तपस्वीनी होती असे असूनही तिच्या आयुष्यात मोहाचा एक क्षण आला त्याबाबत शिक्षा भोगल्यानंतर मात्र तिची पापनिवृत्ती झाली. भारतीय संस्कृतीची महानता यातच आहे की, त्या तपस्वीनीचा भारतीय पंचकन्यांमध्ये समावेश केला आहे. एकदा झालेली चूक, ही शिक्षा भोगून झाल्यानंतर वारंवार सांगितली जाऊ नये, ही शिकवण यातून मिळते असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रामायणावरील तिसरे पुष्प गुंफताना केले.

केळकर बागेत चाललेल्या श्रीराम कथेमध्ये, त्यांनी राम-सीता विवाह सांगून ते स्वयंवर नसल्याचे स्पष्ट केले. स्वयंवर या शब्दाचा अर्थ विस्तृतपणे त्यांनी सांगितला. त्यानंतर अयोध्या येथे आल्यानंतर राम लक्ष्मण हे पुढे बारा वर्षे अयोध्येत होते तर भरत-शत्रुघ्न हे भरताच्या मामासोबत आजोळी गेले. श्रीरामांच्या राज्याभिषेक विचार प्रसंगीही दशरथाने चारी वर्णांच्या प्रमुखांना बोलावून याबाबत त्यांचे मत जाणून घेतले ही महत्वपूर्ण बाब रामायणात नोंदली असल्याचे डॉ.शेवडे यांनी स्पष्ट केले. रामायणातील माहिती नसलेले कंगोरे दाखवून देणारी ही श्रीरामकथा उत्तरोत्तर रंगत चालली आहे.