बेळगाव : म्हैसूर येथे सुरू असलेल्या दसरा क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची पदकांची घोडदौड कायम आहे. येळ्ळूर येथील पैलवान विनायक प्रल्हाद पाटील याने २०२६ च्या दसरा सीएम कप अंतर्गत आयोजित कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
म्हैसूर येथे झालेल्या खुल्या गटातील कुस्ती स्पर्धेत हणमत गौड तालीम, येळ्ळूरचा पैलवान विनायक पाटील याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अव्वल स्थान मिळविले. त्याच्या या यशामुळे येळ्ळूर गावासह बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी कंग्राळी येथील कलमेश्वर आखाड्याच्या पैलवानांनीही दसरा क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर विनायक पाटील याने सुवर्णपदकाची कमाई करत बेळगावच्या कुस्ती परंपरेची उज्ज्वल वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. त्याच्या या यशाबद्दल कुस्तीप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.








