• महापालिका आयुक्तांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे निवेदन
  • मराठी अर्ज मिळेपर्यंत एसआयआर प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

बेळगाव : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज (Enumeration Forms) तातडीने उपलब्ध करून द्यावेत आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक तथा ॲड. अमर येळळूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये बेळगाव दक्षिणसह मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या १६ सप्टेंबर २००८ च्या आदेशानुसार मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेसाठी उपलब्ध करण्यात आलेले अर्ज केवळ कन्नड भाषेत असल्याने मराठी भाषिक मतदारांना त्यांच्या मातृभाषेत अर्ज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषिक आणि लोकशाही हक्कांवर गदा येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात २०२४ मधील घटनाक्रमाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्यानंतर भारत निवडणूक आयोग आणि भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांच्या हस्तक्षेपामुळे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठीतील मतदार याद्या आणि संबंधित साहित्य उपलब्ध करून दिल्याची आठवणही करून देण्यात आली.

मराठीतील अर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावेत, तोपर्यंत संबंधित मतदारसंघांतील एसआयआर प्रक्रिया स्थगित करावी, तसेच भविष्यात मतदार याद्या, अर्ज, नोटिसा आणि जनजागृती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, संजय शिंदे, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, रेणू मुतगेकर, सुनील बाळेकुंद्री तसेच माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.