• लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार राबवली मोहीम

बेळगाव : लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव महापालिकेने आज मारुती गल्ली कॉर्नर येथील एक इमारत अनधिकृत घोषित करत ती हटविण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे संबंधित मालक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता ही कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत आमच्याकडे अधिकृत विक्रीपत्र असून, आम्ही गेली सुमारे ६० वर्षे येथे वास्तव्यास आहोत. बांधकामासाठी आवश्यक परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. तरीही कोणतीही कागदपत्रे नसलेल्या व्यक्तीच्या दाव्यावर विश्वास ठेवून महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप शिवाजीराव हैबत्ती यांनी केला. मोहम्मद शरीफ मुल्ला यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय मालकी हक्क सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अचानक झालेल्या कारवाईमुळे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. पूर्वसूचना न देता जागा खाली करण्याची मोहीम राबवण्यात आल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून याची भरपाई कोण देणार, असा सवाल व्यापारी नूर जहाँ यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र संबंधितांना पूर्वसूचना दिल्याचे सांगितले आहे. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.