बेळगाव : द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या गणेशमूर्तीचा अर्गन तलाव येथे पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा धार्मिक, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

मिलिटरी महादेव मंदिरापासून अर्गन तलावापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक लेझीम आणि झांज-पथक सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण मराठी लोकनृत्यांमुळे मिरवणुकीतील वातावरण भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण झाले. तालबद्ध वाद्यांच्या गजरात जवान आणि नागरिकांनी मराठी संस्कृती व परंपरेचा आविष्कार घडविला.

द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळा पार पडला. मिरवणुकीत अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ), जवान, अग्निवीर, नागरी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.