बेळगाव : महर्षी वाल्मिकी महामंडळातील सुमारे १८७ कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मंत्री बी. नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने अहोरात्र धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मंत्री नागेंद्र यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारमधील कथित भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्यासाठी आपण रात्रीही आंदोलनस्थळी मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार संजय पाटील यांनी राज्यात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप केला. मंत्री नागेंद्र यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर तसेच विधानसभेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी आमदार अनिल बेनके यांनी आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहोरात्र आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगितले. वाल्मीकी समाजासाठी असलेला निधी गैरमार्गाने वापरल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.
माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे सांगितले. तसेच अपंगांचे भत्ते, दुष्काळ आणि पीक नुकसानीची भरपाई देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनात माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.







