बेळगाव : सीमाभागातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या बेळगावच्या राजाच्या २०२६ सालच्या गणेशोत्सवाची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले.
सकाळी ११ वाजता झालेल्या या पूजन सोहळ्यास माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह गल्लीतील नागरिक, युवक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिवत पूजनानंतर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “बेळगावचा राजा म्हणजे बेळगावकरांची आण, बाण आणि शान आहे. बेळगावच्या राजावर हजारो भाविकांची श्रद्धा असून बाप्पा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा मंडळ ४९व्या वर्षात पदार्पण करत असून पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.”
मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव म्हणाले, “बेळगावच्या राजाचा गणेशोत्सव हा सीमाभागातील भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय आहे. दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच सीमाभागातील विविध ठिकाणांहून लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी बेळगावमध्ये येतात. चव्हाट गल्लीतील ‘प्रथम दर्शन सोहळा’ हा गणेशोत्सवातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. मुखदर्शन असो किंवा चरणस्पर्श दर्शन, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.”
यंदाचा गणेशोत्सव दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. मुहूर्तमेढ पूजनाचा सोहळा पार पडल्याने आता गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. भव्य सजावट, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून यंदाचा उत्सव अधिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
मुहूर्तमेढ पूजन सोहळ्यामुळे बेळगावच्या राजाच्या आगमनाची चाहूल लागली असून गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भाविकांचे लक्ष आगामी ‘प्रथम दर्शन सोहळ्या’कडे लागले आहे.








