बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माळमारुती पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गांधीनगर आणि अमीन गल्ली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पदरीत्या दुचाकीवरून फिरणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
रेहान इस्माईल नदाफ (वय २०, रा. गुळजार गल्ली, गांधीनगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवरून विनापरवाना फिरत असून, गंभीर स्वरूपाचा अपराध करण्याच्या उद्देशाने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद आदगोंडा आणि त्यांच्या पथकाने परिसरात तपासणी सुरू केली.
तपासणीदरम्यान रेहान नदाफ याच्याकडे एक लोखंडी कुऱ्हाड, एक चाकू आणि एक कोयता अशी तीन धारदार शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी शस्त्रांसह त्याची दुचाकीही जप्त केली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माळमारुती पोलिसांच्या पथकाचे शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.








