- पत्नी गंभीर जखमी ; चिक्कोडी-मिरज मार्गावर अपघात
- अंकली पोलिसांकडून तपास सुरू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सिद्धापूरवाडी गावाजवळ चिक्कोडी-मिरज मार्गावर महिंद्रा थार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सुधाकर रोकडे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी स्वप्ना यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धापूरवाडी गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा थारची दुचाकीला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील सुधाकर आणि त्यांची पत्नी स्वप्ना रस्त्यावर पडले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी दाम्पत्याला तातडीने चिक्कोडी येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सुधाकर रोकडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी स्वप्ना यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सुधाकर यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातप्रकरणी महिंद्रा थारचे मालक शिवराज बसवराज भास्कर यांच्याविरोधात अंकली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.








