बेळगाव : शहरातील महांतेशनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, सोमवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती जखमी झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महांतेशनगर मुख्य रस्त्यावरून लव्ह डेल शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. रस्त्याने जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हल्ला करणाऱ्या याच कुत्र्याने यापूर्वीही परिसरातील नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. महांतेशनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, महानगरपालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.