• बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव : राज्यातील विविध वस्तू आणि सेवांच्या दरवाढीबरोबरच एसआयआर प्रक्रियेला काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने बेळगावात आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी बसभाडे, दूध, वीज शुल्क, आरटीओ शुल्क, मालमत्ता हस्तांतरण आणि ट्रान्सफॉर्मर शुल्कात झालेल्या वाढीवर टीका केली. सरकारकडून विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात कर वसुली होत असतानाही विकासकामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वीज आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली.

विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ यांनी दूध, बसभाडे, इमारत नोंदणी आणि उत्पादन शुल्कातील वाढीमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगितले. मतदारांची ओळख आणि नागरिकत्व पडताळणीसाठी राबवण्यात येणाऱ्या एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस विरोध करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपचे माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पेट्रोल, दूध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. मोफत बस प्रवास योजनेचा आर्थिक भार पुरुष प्रवाशांवर टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांकडून ट्रान्सफॉर्मर आणि वीज खांबांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरही नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात माजी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार व्ही. आय. पाटील, एम. बी. जिरली, मुरुगेंद्रगौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, उज्वला बडवण्णाचे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.