• शिक्षक भरतीतील मराठी व उर्दू माध्यमाच्या जागांचा मुद्दा
  • निवेदने पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठविली

बेळगाव : शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका म. ए. समितीने केलेल्या पाठपुराव्याची जिल्हा शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. शिक्षक भरतीसंदर्भात समित्यांनी सादर केलेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.

कर्नाटक सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या १५ हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी १२ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. मात्र, या भरतीमध्ये मराठी विषयाच्या जागांचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी तसेच उर्दू विषयाच्या शिक्षकांचा समावेश करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.

समितीच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा शिक्षण विभागाने ही निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या बेंगळुरू येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविली आहेत.

दरम्यान, शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी २०० तर उर्दू माध्यमासाठी ८०० जागांचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असल्याची माहिती आहे. या जागांचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागकडून पुढील पाठपुरावा सुरू आहे.