• भीमगड वनविभागाच्या १० तासांच्या शोधमोहीमेला यश

खानापूर : घनदाट जंगलात रस्ता चुकून बेपत्ता झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाची भीमगड वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून सुखरूप सुटका केली. वन विभागाच्या या मानवतावादी आणि धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खानापूर तालुक्यातील हेम्मडगा गावचे हेमाण्णा मादार (वय ६५) हे आपल्या गुरांना चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. मात्र, घनदाट जंगलात रस्ता चुकल्याने ते बेपत्ता झाले. संध्याकाळी गुरे घरी परतली, परंतु हेमाण्णा मादार न परतल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली.

ग्रामस्थांनी तात्काळ भीमगड वन्यजीव विभागाचे आरएफओ नदाफ यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरएफओ नदाफ यांनी एसीएफ बसवराज वलाड यांचे मार्गदर्शन घेत हेम्मडगा वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांचा समावेश असलेली पाच विशेष शोध पथके तयार केली.

हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या घनदाट जंगलात रात्री ८ वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. वनकर्मचारी आणि ग्रामस्थांनी पहाटे ६ वाजेपर्यंत सलग दहा तास जंगल पिंजून काढले. अखेर अथक प्रयत्नांनंतर हेमाण्णा मादार यांचा शोध लागला आणि त्यांना सुखरूपपणे घरी आणण्यात यश आले.

वन विभागाच्या तत्परतेमुळे एका वृद्धाचा जीव वाचला असून, या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे.