- दोन दुचाकी, विजेच्या खांबांचे नुकसान
- वनविभागाने तातडीने रस्ता केला मोकळा
खानापूर : खानापूर-हल्याळ राज्य महामार्गावरील नंदगडजवळ बिडी रस्त्यावर अचानक मोठे झाड कोसळल्याने एका वृद्धाला गंभीर दुखापत झाली, तर दोन दुचाकी आणि दोन विजेचे खांबांचे मोठे नुकसान झाले. वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

नंदगड-बिडी रस्त्यावरील संगोळ्ळी रायण्णा चौकात ही घटना घडली. रस्त्यालगत असलेला जुनाट वृक्ष अचानक मुख्य रस्त्यावर कोसळल्याने नरसेवाडी येथील पुंडलिक देवप्पा पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेमुळे महामार्गावरील दोन विजेचे खांब तसेच दोन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवकुमार तुरमुरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली.

त्यानंतर नंदगड उप-परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने जेसीबी आणि कटरच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी सुकलेली व धोकादायक झाडे हटविण्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.








