- मुलीच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
बेळगाव : जातीधर्माच्या बंधनांना झुगारून प्रेमविवाह केलेल्या एका महिलेच्या आयुष्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. पहिल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी पती सध्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असताना, दुसऱ्या मुलीच्या शाळा प्रवेशासाठी आणि एसआयआर नोंदणीसाठी आवश्यक असलेले पतीचे आधार कार्ड मिळविण्यासाठी ही आई गदग ते बेळगाव अशी वारंवार धावपळ करत आहे.
संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून गदग येथील एका मुस्लिम महिलेने हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या संसारात दोन मुलींचा जन्म झाला. मात्र, मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पहिल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात तो सध्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहात आहे.
दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वडिलांच्या आधार कार्डची गरज भासत आहे. त्यासाठी संबंधित महिला हिंडलगा कारागृहात वारंवार फेऱ्या मारत असली, तरी तिला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. गुन्हेगार पतीची साथ नव्हे, तर केवळ मुलीचे भविष्य घडविण्यासाठी त्याच्या आधार कार्डाची आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणात कारागृह प्रशासनासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुलीच्या शिक्षणातील अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे.








