• दुसरी संरक्षक भिंतही कोसळली ; बॅरिकेड्स लावून परिसरात प्रवेश बंदी

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक तलावाची संरक्षक भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे आणखी एक भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने कारवाई करत तीन घरे सील केली आहेत.

रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तलावाची दुसरी संरक्षक भिंत कोसळली. यापूर्वी सकाळी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शिवम सुंडीकर आणि परशराम निलजकर या दोन बालकांचा अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतरही पुन्हा भिंत कोसळल्याने धोका अधिक वाढला आहे.

परिसरातील काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित तीन घरे सील केली. रहिवाशांना तत्काळ घराबाहेर काढून त्यांचे साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

तसेच, तलावाच्या चोहोबाजूंनी बॅरिकेड्स लावून संपूर्ण परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.