बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे सोमवारी सकाळी एका ट्रक चालकाचा मृतदेह त्याच्याच वाहनात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गजानन वामन हुरुडे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कलमेश्वर गल्ली परिसरातील रहिवासी होते.

प्राथमिक माहितीनुसार, गजानन हुरुडे यांनी रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर उभा केला होता. त्यानंतर ते ट्रकमध्येच विश्रांतीसाठी झोपले होते. सोमवारी सकाळी ते वाहनात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाणे येथील अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठविला.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून काकती पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.