• तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल : सतीश जारकीहोळी

बेळगाव : कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित शिवम असोसिएट्स प्रकरणाचा तपास अधिकृतपणे सीआयडी कडे सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सीआयडीमार्फत सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण वास्तव आणि व्यवहारांची अचूक माहिती स्पष्ट होईल.

या कथित घोटाळ्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित प्रकरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बेकायदेशीररीत्या निधी गोळा करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले. या तपासामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा त्यांनी केला.

जनतेने जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत संस्थांमध्ये गुंतवणूक करताना सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोणतीही संस्था अवास्तव नफ्याचे आश्वासन देत असल्यास नागरिकांनी त्याची खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे ते म्हणाले. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीसह कठोर कायदेशीर कारवाईही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची बेळगाव येथे बदली करण्यात आल्याची माहिती दिली. ते लवकरच बेळगाव उत्तर विभागाचे नवीन पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना सतीश जारकीहोळी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. निवडणुका संपल्यानंतर गॅस, पेट्रोल, डिझेल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्याची पद्धत नवी नसल्याचा आरोप त्यांनी केला. सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक परिस्थिती आणि विकासाच्या नावाखाली इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढवणे हे जनविरोधी धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच, पूर्वी किरकोळ दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप नेते आता वाढत्या महागाईबाबत मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.