• प्रा. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन
  • राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे पुरस्कार वितरण

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ठिणगी बेळगावच्या साहित्य संमेलनातून पडली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे बेळगाव कर्नाटकचे असल्याचे आम्ही कधीही मानत नाही. बेळगाव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय असून, येथील मराठी भाषिकांनी संघर्षातून भाषा आणि चळवळ जिवंत ठेवली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कविमंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे झाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. लवटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. अकादमीचे निमंत्रक प्रा. प्रदीप पाटील तसेच शब्दगंध कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविक केले. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्रा. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

प्रा. लवटे म्हणाले, भाषा नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होते. त्यामुळे भाषा जपणे अत्यंत आवश्यक आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या माध्यमातून भाषा, साहित्य आणि कलेचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. पुरस्कारांच्या माध्यमातून देश आणि माणसे जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अकादमी करत आहे. संस्कृतीचे महत्त्व विसरण्याची वेळ आलेल्या काळात अकादमीचे कार्य अधिक मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राजारामबापू पाटील हे सुसंस्कृत नेतृत्व होते. त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी पुरस्कारांच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक चौसाळकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल उभे केले आणि ते प्रत्यक्षात राबविण्याचे कार्य राजारामबापूंनी केले.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, लोकनेता कसा असावा याचा आदर्श राजारामबापू पाटील यांनी घालून दिला. ते केवळ राजकारणी नव्हते, तर समाजहितासाठी लढणारे खरे लोकनेते होते. सत्ता माणसाला मोठे करत नाही, तर समाजासाठी केलेले कार्य व्यक्तीला मोठेपण प्राप्त करून देते, असेही त्यांनी सांगितले.

कवयित्री सिसिलिया कारव्हालो यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ॲड. राजाभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा आणि सीमाभागातील साहित्यप्रेमी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्राचार्य अनिल सावंत यांनी मानले.

  • बेळगाव महाराष्ट्राचेच : जयंत पाटील

बेळगावात शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक वास्तव्यास आहेत. मराठी भाषेवरील प्रेमातूनच सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. त्यामुळे बेळगाव महाराष्ट्राचेच असल्याची भावना आमच्या मनात असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. साहित्य समाजाला दिशा देण्याचे आणि परिवर्तन घडविण्याचे कार्य करत असते. जिथे मराठी भाषिक आहेत, त्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम घेण्याच्या उद्देशाने बेळगावात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

  • मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

यावेळी प्रा. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविता आणि ललित लेखनातील योगदानाबद्दल कवयित्री सिसिलिया कारव्हालो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर), कथासाहित्यातील योगदानासाठी डॉ. सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर), तर समीक्षेतील कार्यासाठी प्रा. डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी कार्य करणारे अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांनाही १५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.