• पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
  • बेळगावात उच्चस्तरीय हालचालींना वेग
  • डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे ताब्यात

बेळगाव : शहरासह राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या तब्बल ४,५०० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक महाघोटाळ्याच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुळेद यांच्यासह तीन वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. यावेळी मार्केट विभागाचे एसीपी, माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय तसेच सीएन पोलीस ठाण्याचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती, जप्त केलेली महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची प्राथमिक माहिती तसेच वेबसाईट आणि ऑनलाईन व्यवहारांशी संबंधित डिजिटल पुराव्यांचा तपशील सीआयडी पथकाला सादर करण्यात आला. या बैठकीनंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी प्रकरणाशी संबंधित अधिकृत फायली आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या बहुचर्चित प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर करण्यासाठी सीआयडीकडून स्वतंत्र तपास यंत्रणा सक्रिय करण्यात येणार असून आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि डिजिटल नेटवर्कचा सखोल तपास केला जाणार असल्याचे समजते.