- जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांकडून जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली.
कल्लेहोळ येथील सुमारे १०० ते १२५ शेतकरी कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. १९७२ च्या न्यायाधिकरण कायद्यानुसार कसणाऱ्याच्या हक्काची जमीन असल्याचा दावा करत, शेतकऱ्यांकडे फॉर्म क्रमांक ७, फॉर्म क्रमांक १० यासह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही काही भूमाफिया आणि अधिकारी संगनमताने जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अन्याय सुरू राहिल्यास त्यांच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








