• अवजड वाहनांना प्रवेशबंदी
  • सकाळी ११ पासून मिरवणूक संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

बेळगाव : रविवारी  १ नोव्हेंबर रोजी शहरात काळा दिन आणि कर्नाटक राज्योत्सवानिमित्त निघणाऱ्या फेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

काळा दिन आणि कर्नाटक राज्योत्सवानिमित्त शहरात भव्य फेऱ्या काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून राज्योत्सवाची मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार आहेत.

कोल्हापूर सर्कलवरून चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहने जिनाबकुल सर्कल, बॉक्साईड रोड, हिंडलगा, फॉरेस्ट नाका आणि शौर्य चौकमार्गे खानापूरकडे वळवण्यात येणार आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकाकडून खडेबाजारकडे जाणाऱ्या वाहनांनी जिजामाता सर्कल, व्हीआरएल लॉजिस्टिक्स आणि जुना पी. बी. रोडमार्गे खानापूर रोडकडे जावे. खानापूरहून बेळगावकडे येणारी वाहने मिलिटरी महादेव मंदिराजवळून असदखान दर्गा आणि गवळी गल्ली क्रॉस मार्गे शहरात प्रवेश करतील.

गोगटे सर्कलकडून येणारी वाहतूक ग्लोब थिएटर, शरकत पार्क, शौर्य चौक आणि हनुमाननगर डबल रोडमार्गे बॉक्साईड रोडकडे वळवण्यात येणार आहे.

त्यामुळे रविवारी शहरात येणाऱ्या नागरिकांनी वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले आहे.