• विद्यार्थ्यांच्या जेवणाची गुणवत्ता तपासली 
  • स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना खडसावले
  • सुविधांचा दर्जा सुधारण्याचे निर्देश

बेळगाव : राज्याचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी शनिवारी अशोकनगर येथील हिंदूळिद वर्ग कल्याण विभागाच्या संगोळ्ळी रायण्णा वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघर, विद्यार्थ्यांना दिला जाणारा नाश्ता आणि जेवणाच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी केली. तसेच स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

या वसतिगृहात सध्या १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पुरेसे बेड उपलब्ध करून द्यावेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बेड आणि ब्लँकेट यांचा दर्जा चांगला असावा, असे निर्देश त्यांनी दिले.

सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य आणि निर्धारित उद्देशासाठीच वापर करावा, अशी सूचना उपलोकायुक्तांनी केली. वसतिगृहातील ग्रंथालय, भोजन कक्ष आणि डायनिंग टेबल यांसारख्या सुविधा व्यवस्थित ठेवण्यास सांगितले. हजेरी पुस्तके आणि विविध रजिस्टर अद्ययावत ठेवावीत, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नेहमी सुरू स्थितीत असतील याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे सामान ठेवण्यासाठी योग्य जागेची व्यवस्था करावी. खोल्या, शौचालये आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखावी. ठरवून दिलेल्या मेनूनुसारच विद्यार्थ्यांना जेवण द्यावे आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हा मागासवर्गीय कल्याण अधिकाऱ्यांनाही त्यांनी कडक सूचना केल्या.

या पाहणीवेळी बेळगाव लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, उपनिबंधक अरविंद, कल्याण अधिकारी बसवराज कुरिहुळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.