• चार महिन्यांनंतरही प्रशासनाची उदासीनता
  • विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांवर रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करण्याची वेळ
  • आंदोलनाचा इशारा

बेळगाव : जुने बेळगाव परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना बस निवाऱ्याअभावी दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, चार महिन्यांपूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बस निवारा तातडीने उभारण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा निवेदन सादर करण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीबीटी परिसरातून जुने बेळगावकडे बससेवा उपलब्ध असली तरी परतीच्या प्रवासासाठी योग्य बस स्थानक किंवा बस निवारा नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. ऊन, पाऊस आणि वाहतुकीच्या धोक्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘पीएसआर मानवाधिकार संरक्षण परिषदे’चे बेळगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पवन गाडीवड्डर यांनी चार महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याने त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने बस निवारा उभारण्याची मागणी केली आहे.

जुने बेळगाव परिसरातील नागरिकांची ही मूलभूत गरज तातडीने पूर्ण करावी, अन्यथा शांततापूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.