- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना १.८० लाख सह्यांचे निवेदन
- मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी श्री मुक्तानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने गोरक्षक आणि नागरिक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान १.८० लाख सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठविण्यात आले.
‘गौ सन्मान आवाहन अभियान’च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आयोजित या आंदोलनात गोसंरक्षण, गोसंवर्धन आणि जनजागृतीसाठी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना श्री मुक्तानंद स्वामीजी यांनी पहिल्या टप्प्यात १.८० लाख सह्या गोळा करून निवेदन सादर करण्यात आल्याचे सांगितले. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हानिहाय कार्यक्रमांद्वारे पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने आणि राष्ट्रपतींनी गोमातेला तातडीने ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्यावा, अन्यथा ऑगस्ट २०२७ मध्ये दिल्ली येथे उपोषण आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी गोरक्षक निलेश यांनीही सरकारवर नाराजी व्यक्त करत, यापूर्वी तहसीलदारांमार्फत सादर केलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा निवेदन देण्यात आल्याचे सांगितले. गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्याबरोबरच स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करावे, रस्त्यावर जखमी होणाऱ्या जनावरांसाठी २४ तास रुग्णवाहिका आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ऑक्टोबर २०२७ मध्ये साधू-संतांच्या नेतृत्वाखाली बंगळूरमध्ये व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने गोरक्षक, साधू-संत आणि नागरिक सहभागी झाले होते.








