पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व कला दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामधे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची देशभरातील नामवंत चित्रकारांनी आपापल्या शैलीतून रेखाटलेली चित्रे व अर्कचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सोबतच ठाकरे यांनी रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रे रसिकांना पाहायला मिळतील.

या दिनाचे औचित्य साधून काही ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यात बेळगावच्या जगदीश कुंटे यांच्या खेरीज वैजनाथ दुलंगे, श्रीनिवास प्रभुदेसाई, अवि जाधव, राजीव गायकवाड, रवींद्र बाळापुरे आणि खलील खान यांचा समावेश आहे.

याशिवाय दोन दिवसात नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने, छोट्यांसाठी कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला गेला. या दोन दिवसाच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप, कार्टून कट्टा आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.