• माती उकरताना मडक्यात सापडला ऐतिहासिक ठेवा
  • कामगारांनी प्रामाणिकपणे प्रशासनाकडे केली सुपूर्द

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात काम सुरू असताना कामगारांना १४ सोन्याची नाणी सापडल्याची घटना समोर आली आहे. सापडलेली नाणी कोणतीही हयगय न करता कामगारांनी ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंचल गावातील शासकीय वसतिगृहाजवळ काही काम सुरू होते. यावेळी माती उकरताना कामगारांना एका मडक्यात सोन्याची नाणी आढळून आली. एकूण १४ नाणी असून त्यांचे वजन सुमारे ५४.८ ग्रॅम आहे. या नाण्यांची किंमत आठ लाख रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाणी सापडताच कामगारांनी ती तातडीने ग्रामपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा करून नाणी ताब्यात घेतली. त्यानंतर सवदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णावर यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला.

  • पश्चिम गंग किंवा विजयनगर काळातील नाणी?

प्राथमिक माहितीनुसार, ही सोन्याची नाणी दहाव्या ते पंधराव्या शतकाच्या कालखंडातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम गंग घराणे किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळाशी त्यांचा संबंध असू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे.

या नाण्यांवर हत्तीचे चित्र अंकित असून त्यांना ‘गजपती गद्याण’ किंवा ‘गजपती वराह’ असे संबोधले जाते. नाण्यांचा नेमका कालखंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पुरातत्त्वीय महत्त्व निश्चित करण्यासाठी ती तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

सापडलेला मौल्यवान ऐतिहासिक ठेवा स्वतःकडे न ठेवता प्रशासनाच्या स्वाधीन करणाऱ्या कामगारांच्या प्रामाणिकपणाचे तालुका प्रशासन आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला.