• रोलर डर्बी स्पर्धेत दोघींनीही पटकावले रौप्यपदक

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स खुशी घोटीवरेकर आणि अन्वी सोनार यांनी बंगळूर येथे झालेल्या रोलर डर्बी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदकांची कमाई केली.

राज्यस्तरीय या स्पर्धेत २०० हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खुशी घोटीवरेकर हिने रौप्यपदक, तर अन्वी सोनार हिनेही रौप्यपदक पटकावत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

खुशी आणि अन्वी या दोघीही स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येळ्ळूकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.

दोन्ही खेळाडूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यांच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.