• दोघांना अटक ; जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती

बेळगाव : घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्लोळी गावात झालेल्या रमेश बांदोली यांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मी वडेयार आणि बनप्पा वडेयार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कल्लोळी येथे रमेश बांदोली यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी रमेश यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवर स्वतःचा आणि लक्ष्मी वडेयार यांचा फोटो पोस्ट केला होता. या कारणावरून निर्माण झालेला वाद तसेच पूर्वीच्या वैमनस्यातून दोन्ही आरोपींनी रमेश यांना कल्लोळी येथील घरामागील परिसरात बोलावून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या रॅपिड ॲक्शन टीमने कारवाई करत लक्ष्मी वडेयार आणि बनप्पा वडेयार या दोन्ही संशयितांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हत्येप्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले.