• चारा वाहून नेणारे वाहन उलटले 
  • पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पूर्ववत

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हलगा पुलावर गुरुवारी रात्री चारा वाहून नेणारे वाहन पलटी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले.

दावणगेरेहून नसलापूरकडे चारा घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड बडा दोस्त वाहनाचे हलगा पुलावर नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर उलटले. अपघातामुळे वाहनातील चाऱ्याची पोती महामार्गावर विखुरली गेली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी विधानसौधच्या बाजूने बेळगावकडे जाणारी वाहने काही काळ सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली.

दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. तसेच महामार्गावर विखुरलेल्या चाऱ्याची पोती हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.