- पंत बाळेकुंद्री येथे रास्ता रोको
- २४ तासांत ७ ते ८ तास वीजखंडित होत असल्याचा आरोप
- समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा
बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने पंत बाळेकुंद्री येथील पंतनगर विद्युत केंद्रावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अलीकडे मोठ्या प्रमाणात अनियमित वीजपुरवठा होत असून सकाळी, रात्री तसेच दिवसभरात कोणत्याही वेळी वीजखंडित केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
एकूण २४ तासांपैकी ७ ते ८ तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विद्यार्थ्यांसह गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेल्या मंडळांनाही या समस्येचा फटका बसत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
शेतांमध्येही अनियमित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी ससेहोलपट होत आहे. पावसाने दडी दिल्यामुळे पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा आवश्यक असताना तो सुरळीत होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २२ हजार रुपये भरून विद्युत जोडणी करून घेण्याचा दबाव हेस्कॉमचे अधिकारी आणत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यामुळे गणेशभक्तांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे सांगत त्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. उपस्थित आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. माजी आमदार संजय पाटील, माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव आणि मंडळ अध्यक्ष युवराज जाधव यांनी यावेळी आपले विचार मांडत अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत ताकीद दिली.
वीजपुरवठ्याच्या समस्यांचे निवारण न झाल्यास येत्या काळात उग्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मारिहाळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप पूर्व भागातील कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








