• सीसीटीव्ही ; ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात आणि शहरात मिळून तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

बेळगाव शहर आणि जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा जिल्ह्यात एकूण साडेसहा हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होणार आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक तालुक्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे. संवेदनशील भागामध्ये जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच चक जिल्हा पोलीस मुख्यालयातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

“कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,”असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.