• २०० पोलिसांचा बंदोबस्त
  • ऊसदराच्या मागणीसाठी महाराष्ट्र – कर्नाटकातील शेतकरी आक्रमक

कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दिल्ली येथे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केले आहे. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ आणि हत्तरगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून डीएसपी गोपाळ गौडर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये तीन सीपीआय, आठ पोलीस उपनिरीक्षक, २० एएसआय आणि सुमारे २०० पोलिसांचा समावेश आहे. तसेच, तात्पुरत्या सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे आंदोलनस्थळावर लक्ष ठेवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी दाखल होताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ आणि ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांतून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत ठाम भूमिका मांडली.

  • कमानीवर चढून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न :

दरम्यान, आंदोलन सुरू असताना हत्तरगी टोलनाक्यावरील महामार्गाच्या कमानीवर चढून एका शेतकऱ्याने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सकाळपासून हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असताना सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थित शेतकरी आंदोलक आणि पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला समजावून सांगत त्याला पकडले आणि त्याचा जीव वाचविला. ऊसदराच्या मागणीसाठी सीमाभागात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे हत्तरगी टोलनाका आणि आसपासच्या राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.