- ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी तातडीने प्रशासकीय बैठकीचे आयोजन करत विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला. यावेळी शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था आणि प्लास्टिकमुक्ती मोहिमेबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
सोमवारी कॅन्टोन्मेंट सभागृहात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार हरीविजय यांनी शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. एल अँड टी कंपनीकडून अनेक भागांत रस्ते खोदून कामे अर्धवट ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत ब्रिगेडियर उपाध्ये यांनी संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नमूद करत खोदकाम झालेल्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. असद खान दर्ग्यासह अनेक ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे या भागात असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देतात. पर्यटकांकडून वापरण्यात येणारे प्लास्टिक परिसरात टाकले जात असल्याने स्वच्छतेची समस्या गंभीर होत असल्याचे ब्रिगेडियर उपाध्ये यांनी निदर्शनास आणून दिले.
यासाठी “प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट” अशा संदेशांचे जनजागृती फलक असद खान दर्ग्यासह विविध सार्वजनिक ठिकाणी उभारण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात विशेष लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.








