• खेळ आणि संवादाच्या माध्यमातून ५० विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेचे मार्गदर्शन

बेळगाव : मासिक पाळीविषयी असलेला संकोच दूर करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पाही व्हाईब्स फाऊंडेशनतर्फे बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत ‘हॅलो पिरियड्स’ जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ८ ते १२ वयोगटातील सुमारे ५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डिंपल पोरवाल आणि सिल्कू पोरवाल यांनी या सत्राचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी खेळ, रंजक उपक्रम आणि मोकळ्या संवादाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली. खेळांमधून आणि चर्चेतून विषय समजावून सांगण्यात आल्याने विद्यार्थिनींना आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारण्याची संधी मिळाली.

पाही व्हाईब्स फाऊंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा यू. यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डिंपल पोरवाल, सिल्कू पोरवाल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मेघा दुदमी आणि सहभागी विद्यार्थिनींचे आभार मानले.

मासिक पाळी हा नैसर्गिक विषय असून त्याबाबतचा संकोच आणि गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून शालेय स्तरावर जनजागृती सत्रे आयोजित करून मुलींमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रक्षा यू. यांनी सांगितले.