- प्रतिष्ठित नागरिकांशी साधणार संवाद
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून, भाजपच्या विशेष अभियानांतर्गत शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ‘लोकशाही वाचवा! अराजकता दूर करा!’ (सेव्ह डेमोक्रसी फ्रॉम अराजकता) या विषयावर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता धर्मनाथ भवन येथे होणार आहे.
लोकशाहीचे संरक्षण आणि देशाची सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर या संवादाच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात येणार आहे. विरोधकांकडून होणारा कथित अपप्रचार तसेच देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार जगदीश शेट्टर आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संवादासाठी बेळगाव शहरातील सुमारे ६५० ते ७०० प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जात, धर्म आणि भाषेचे भेद बाजूला ठेवून लोकशाही व देशाच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील या संवादात बेळगावमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.







