- तिघांना अटक ; १ लाख ५०० रुपये किमतीचा २.१२० किलो गांजा जप्त
बेळगाव : शहरात गांजाची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत २.१२० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १ लाख ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२६ नोव्हेंबर रोजी ऑटोनगर औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी सॉ मिलजवळील सार्वजनिक ठिकाणी सीसीबी पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. या पथकात पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.
अटक करण्यात आलेल्यांची नावे शिवानंद ऊर्फ परश्या सुक्कनवर (वय २३, रा. परकनट्टी, हिडकल धरण परिसर), नागराज रामचंद्र भोवीवड्डर (वय २४, रा. सुब्बय्या कॅम्प, हिडकल धरण परिसर) आणि लक्ष्मण केंपण्णा कटाबली (वय २६, रा. चिलाभावी, हिडकल धरण परिसर) अशी आहेत. तिन्ही संशयित हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित ‘हिरो पल्सर’ मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक करून त्याची विक्री करत होते. आर्थिक फायद्यासाठी हा अवैध व्यवसाय सुरू असताना सीसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान हा गांजा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील राजेश चौहान याच्याकडून मिळवल्याची माहिती संशयितांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांजाच्या पुरवठ्याचा स्रोत आणि त्यामागील साखळी तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) १९८५ मधील कलम ८(सी) आणि २०(बी)(ii)(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईतील कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी सीसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.








