• विधिमंडळ अधिवेशनाचा निषेध करणार 
  • बेळगाव तालुका म. ए. समितीचा निर्धार
  • लिंबाळेंना अध्यक्षपदावरून हटवा 
  • अन्यथा साहित्य संमेलनात काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या अस्मितेचा आणि सीमाप्रश्नाचा आवाज बुलंद करण्यासाठी यंदाही २ डिसेंबर रोजी महामेळावा घेण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. जिल्हा प्रशासनाकडून महामेळाव्याला परवानगी नाकारली जात असली तरी गनिमी काव्याने महामेळावा घेऊन बेकायदा विधिमंडळ अधिवेशनाचा तीव्र निषेध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सीमालढ्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास पुण्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी मराठा मंदिर येथे माजी आमदार व समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सीमाप्रश्न, महामेळावा आणि शरणकुमार लिंबाळे यांच्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मनोहर किणेकर म्हणाले, शरणकुमार लिंबाळे यांना सीमाप्रश्नाची पुरेशी माहिती नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावनांची जाणीव न ठेवता त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. स्वतःला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या लिंबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सीमाभागातील मराठी जनतेवर झालेल्या अन्यायाबाबत व्यक्त केलेली भूमिका तरी समजून घ्यायला हवी होती. त्यांच्या वक्तव्यामुळे मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हटवावे. अन्यथा पुण्यातील साहित्य संमेलनात काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येईल. तसेच, मराठी साहित्य परिषद आणि नांदी संमेलनाच्या आयोजकांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

समितीचे नेते आर. आय. पाटील यांनीही लिंबाळे यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक मदतीतून साहित्य संमेलनाचे आयोजन होत असल्याने सीमाप्रश्नाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षपदी कायम ठेवू नये. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मांडावा, असे त्यांनी सुचविले. यापूर्वी अनेक साहित्य संमेलनांत सीमाप्रश्नावर ठराव झाले आहेत. त्यामुळे आगामी संमेलनातही सीमाप्रश्न आणि सीमालढ्यातील हुतात्म्यांबाबत ठराव होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महामेळाव्याच्या आयोजनाबाबत बैठकीत ठाम भूमिका घेण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून महामेळाव्याला परवानगी दिली जात नसली तरी यंदा २ डिसेंबर रोजी महामेळावा होणारच, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रशासनाची परवानगी नसल्याने गनिमी काव्याने महामेळावा आयोजित करण्यात येणार असून, अधिवेशनाच्या दोन दिवस आधी महामेळाव्याचे ठिकाण जाहीर केले जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृती करून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.

समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी लिंबाळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली. बैठकीत बी. डी. मोहनगेकर, नारायण सांगावकर, शिवाजी खांडेकर, प्रकाश अष्टेकर आणि अनिल पाटील यांनीही आपली मते मांडली.

यावेळी व्यासपीठावर अॅड. एम. जी. पाटील, मोनाप्पा पाटील, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर आणि विठ्ठल पाटील उपस्थित होते. बैठकीला तालुका समिती व युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.